माझा योगा आणि आसपासची योगी मंडळी

मी योगावरती बरेच वाचन (अंथरुणावर पडुन) केले आहे .त्यामुळे माझी थिअरी पक्की पण प्रॅक्टिकल झीरो अशी स्थिती आहे.
गेल्या आठवड्यामध्ये मी पहिल्यांदाच इंटरनॅशनल योगा डे मध्ये भाग घेतला.त्याची पार्श्वभूमी अशी की “पम्ब्या फार जाड झाला आहे,कदाचित फुटेल सुद्धा .त्यामुळे त्याला योगाची सक्ती करणे अत्यावश्यक आहे असे मित्रानी ठरवले होते ( स्पष्टीकरण : “पम्ब्या=मी” खरे नाव आधार कार्ड वर बघावे लागेल). माझ्या बायकोचा पण याला 1000% पाठींबा होता. मी तुझी अर्धागी नाही फक्त 10% आहे असा जोक तिने केल्यावर मी बापडा काय बोलणार.
त्यात भर म्हणजे आमचे पुत्र रत्न गुंड्या याची मला शोभले अशी तब्येत. त्याचे खरे नाव रत्नाकर जे माझ्या वडिलांनी ठेवले होते. वडील सराफ असल्याने त्यांनी दुसरी मुलगी होईल हे गृहीत धरून तिचे नाव हिरा ठरवले आहे. मुलीचे बारसे झाल्या बरोबर वर मी लगेच एक भू भू आणून त्याचे नाव मोती ठेवून हा विषय संपवेन. असो तर गुंड्या 4 वर्षाचा झाल्यावर त्याला गुबगुबीत हे विशेषण मिळाले आहे.तो माझ्या पायावर पाय आणि नंतर खांद्यावर पाय ठेऊन माझ्या पुढे जाणार हे स्पष्ट दिसत होते.
त्यामुळे वाढती जाडी हा विषय मुळातूनच संपवण्यासाठी ‘बापाला बारीक करा’ असा निर्णय घेण्यात आला
मित्र परिवार ,बायको यांच्या आग्रहाने मला पण जोश चढला आणि आणि मी ताबडतोब नवीन ट्रॅक पॅन्ट आणि नवीन टी-शर्ट घेऊन आलो.योगा डे च्या दिवशी शक्य तितके वाकुन, हात पाय मुडपून आणि सर्वांग ताणून जमेल तशी सर्व आसने पूर्ण केली. ग्रुप फोटो झाला,योगाबीट संस्थेकडून प्रशस्तीपत्र मिळाले . वा वा पम्ब्या आता हठयोगी झाला असे मित्रांनी कौतुक केले.
त्याच उत्साहात मी घरी परत आलो. खूप श्रम केल्या मुळे भरपूर भोजन केले आणि प्रदीर्घ विश्रांती घेतली.दुसऱ्या दिवशी उठायला फारच उशीर झाला. मोठ्या मुश्किलीने धावत पळत कंपनीची बस कशीबशी पकडली. ही धावपळ करताना आपली पॅन्ट खाली घसरत आहे हे लक्षात आले. आणि हा तर कालच्या योगाचा परिणाम हे लक्षात आले आणि माझा आनंद बसमध्ये मावेनासा झाला . त्याच आनंदात मला पुन्हा झोप लागली न लागली तोपर्यंत शेर और सिंघम या सुपर हिट सिनेमाचा दिग्दर्शक रोहित पुरोहित मला बघून एकदम बस मध्ये उडी मारून शिरला आणि माझ्या जवळ येऊन धापा टाकत म्हणाला " सर सर आप क्या स्लिम ट्रिम फिट आदमी है.अक्षय (काटकुळे बर का!) के साथ मेरी नई फिल्म में रोल करेंगे ?" आणि तेवढ्यात अक्षय पण पोचला. धापा टाकत त्याने सांगितले “ ये तो मेरेसे फिट है .इनको हिरो बना दो. मै इनके पप्पा का रोल करुंगा ”. त्यांच्या आग्रहाला मान देऊन मी करारावर सही केली आणि करून १ कोटीच्या ॲडव्हान्सचा चेक घेण्यासाठी हात पुढे केला .तेवढ्यात दोन तासाचा प्रवास संपला आणि बस कंपनीमध्ये पोचली आणि माझे स्वप्न संपले.वाईट वाटले पण पहाटेची आणि कामाच्या वेळात पाहिलेली स्वप्ने पुर्ण होतात असे स्वतःला सांगून मी ऑफिस मध्ये प्रवेश केला .
माझी स्थिती हा आनंद कुणाला सांगू,किती सांगू, काय काय सांगू ,कसा सांगू अशी होती. शेवटी मग पॅन्ट्री मध्ये चहा किंवा कॉफी प्यायला जो येईल त्याला हठयोगाचे वर्णन करायचे असे ठरवून दिवसाची सुरुवात केली.
पण उत्साह आवरता येत नव्हता म्हणून चहा नको असला तरी मी पॅन्ट्री मध्ये चकरा मारू लागलो. पण आज कोणी भेटेचना. मोठ्या साहेबांचा PA मात्र तीनदा भेटला.आज रिकामटेकडेच दिसताय. काही काम नाही वाटतं असे कुत्सितपणे म्हणून (हे आपल्याला पण लागू पडते हे विसरून) परत आपल्या साहेबांच्या केबिन बाहेरच्या टेबलावर परत गेला.
शेवटी एकदाचा मुहूर्त लागला.आमचे डेप्युटी असिस्टंट ज्युनियर व्हाईस प्रेसिडेंट पॅन्ट्री मध्ये भेटले. ते आमच्या कंपनीच्या मालकांच्या मेव्हण्याच्या मेव्हण्याच्या मेव्हण्याचे मेव्हणे होते. या जवळच्या नात्यामुळे आपल्याला अतिशय जबाबदारीची पोस्ट दिली आहे असे त्यांना वाटत होते. कंपनीचा फायदा म्हणजे प्रॉफिट वाढवला की आपल्याला नक्कीच यापेक्षाही वरची पोस्ट मिळणार याची त्यांना खात्री होती. त्यामुळे ते सतत कसला न कसला तरी अभ्यास करत असायचे आपण फार विद्वान आणि इंटेलेक्चुअल आहोत याची त्यांना खात्री होती.टक्कल पडल्यामुळे त्यांचे कपाळ मोट्ठे दिसायचे आणि स्वाभाविक पणे बरेच जण त्यांना तुम्ही फार हुशार दिसता असे म्हणत. टकलावर 1 जरी केस आला तरी ते लगेच काढत .टक्कल पडल्यामुळे आनंद होणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश करता येईल.
तसे ते स्वभावाने प्रेमळ होते. मी डाव्या हाताने घसरणारी पॅन्ट सांभाळत आणि उजव्या हाताने चहाचा कप धरून त्यांना माझ्या हठयोग साधने बद्दल सांगितले त्यांनी ते शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाले अरे बाबा मी ज्ञानयोगी आहे रे. मला तेच जमते. आता जातो कारण अजुन आज 570 पाने वाचायची आहेत.
माझ्या ज्ञानात भर पडली अरेच्चा हठयोगी सारखे ज्ञानयोगी पण असतात तर.
थोड्यावेळाने राजाराम राजे आला. ओठात धुम्रनलिका,डोळ्यावर गॉगल ,अंगावरती लाल ठिपक्या ठिपक्यांचा शर्ट आणि खाली जीन पॅन्ट असा त्याचा रुबाब होता.पोट मात्र पॅन्ट आणि शर्ट यांच्या संगमाला विरोध करून निसटण्याचा प्रयत्न करत होते. तो आमच्या मोठ्या साहेबांचा जवळचा नातलग, घरची गडगंज संपत्ती.सगळा वेळ घरी बसून कंटाळा यायचा म्हणुन नोकरी धरलेली. त्यामुळे नावाप्रमाणेच तो राजाच होता. मनात येईल तेच करायचा. माझ्या हठयोग विषयीच्या बोलण्याकडे तुच्छ पणे दुर्लक्ष करून सिगरेटचा धूर काढत होता .मी पण वाचलंय ते योगा बिगा. त्यातलं ते राजयोग वगैरे असतं ना ते आपल्याला जमेल. झाल तर राजयोगी होणार नाय तर राजाराम राजेच राहणार. असे ताशेरे मारून धूर काढत निघून गेला.
माझ्या माहितीत भर पडली की असे राजे योगी पण असतात
शेवटी मी हा नाद सोडून लॅपटॉप वर योगा वरती वाचन सुरु केले. दुपारी साडेतीन-चार ला शेजारच्या उदासे साहेबांकडे पाहिलं दिवसभर मान खाली घालून काम करणारे साहेब जरा मोकळा श्वास घेत होते. लगेच जाऊन त्यांना मी हठयोगा वरती सांगायला सुरु केले. संपायच्या आधी साहेबांनी सोड रे बाबा ते आपल्याला काय जमणार नाही. मी म्हणजे कर्मयोगावर विश्वास ठेवणारा.आपण आपलं काम करायचं बाबा.पेपर पुढे ढकलायचा आणि जे होईल ते वरच्यावरती सोडायचं असं म्हणून मला कटवण्याकरता स्वतःच टेबलावरून उठले.
भगवान कृष्णालाही माहिती नसेल की आपल्या कर्मयोगाचा असा अर्थ कोणी इथे बसून करत आहे.
दिवस संपायला आला होतो तेवढ्यात आमचे दोन सहकारी हातात गिफ्ट बॉक्स,गिफ्ट बॅग घेऊन मोठ्या साहेबांच्या केबिन कडे जाताना दिसले. साहेबांचा वाढदिवस आहे उद्या असे सांगत ते दृष्टिआड झाले .त्यांचे स्थान आमच्या कंपनीत जरा विशेषच होते. साहेब आपल्याला किती जवळचे समजतात,रात्री कंपनीच्या प्रॉब्लेम विषयी फोन करून आपला कसा सल्ला घेतात, माझ्या मुलाला ऑक्सफर्ड का केंब्रिज विद्यापीठात पाठवावे या करता त्यांनी मला गाईड केले,साहेब नंबर एक आहेत, त्यांचे पान सुद्धा माझ्याशिवाय हलत नाही अशी अनेक वाक्ये त्यांच्या बोलण्यात असायची .जवळपास प्रत्येक वाक्यात सुरुवात किंवा शेवट किंवा मध्य किंवा सर्वत्र ‘साहेब” आणि ‘मी’ हे दोन शब्द असणारच. माझ्या लक्षात आलं यांना बोलण्यात काही अर्थच नाही. स्वार्थी भक्ती योगाचे हे नमुने दिसतायेत.
शेवटी दिवस संपला. व्यवहारी जीवनात सोयीनुसार ज्ञानयोग,राजयोग,कर्मयोग,भक्तीयोग यांचा हवा तसा अर्थ लावणारी मंडळी पाहून मी घरी परतलो.
दार उघडतानाच गुंड्याच्या रडण्याचा आवाज आला.आत पाहिले तर त्याने कधी पाठीवर तर कधी पोटावर लोळत, इकडे पाय- तिकडे पाय, मागे हात- पुढे हात, खाली डोकं- वर डोकं करत भोकाड पसरलं होतं. मला एकदम वाटलं बायको त्याला हठयोग शिकवतेय आणि तो नीट जमत नाही म्हणून ही रडारड चालू आहे. कौतुकाने बायकोकडे पाहात मी म्हणलो हा नक्की मोठा हठयोगी होणार. बायकोने त्याच्या पाठीत एक धपाटा घातला आणि म्हणाली ‘’सोडा तसला विचार.याला रात्री जेवायला पिझ्झा ,बर्गर पाहिजे म्हणुन रडतोय .हा तर हट्ट योगी आहे.”.
मी पुन्हा माझा मुद्दा रेटला “पण मला फायदा होतोय बघ .एका दिवसात पोट कमी झाले आहे “.
काही पोट कमी नाही झालय .सकाळी घाईघाईत बेल्ट न घालता गेलास ऑफिसला आणि म्हणून घसरतीये पॅन्ट. लक्षात पण येत नाही .कसा संसार मी करते ते मलाच माहिती ई. ई. ई.
हे ऐकल्यावर माझा पण इंटरेस्ट संपला .उगीच अक्षय ,अजय, यांच्या पोटावर पाय कशाला द्यायचा असा उदात्त विचार मनात आला.
आणि तेंव्हापासुन या सगळ्यांचा नाद सोडून मी मुकाट्याने आपली नोकरी चालू ठेवली आहे.
विवेक कुमठेकर ,पुणे. 27 जून 2025