अनंत आहे आकाश

खूप दिवसांनी सकाळी पोडियम वर गेलो. स्विमिंग पूलच्या पलीकडे दिसणाऱ्या हिरव्यागार टेकड्या डावीकडच्या फोटोत दिसते त्याप्रमाणे आता पडद्याआड जाऊ लागल्या होत्या. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर समोर फक्त एक काँक्रिटची भिंत दिसणार हे उघड होते.
आधीच अपार्टमेंटच्या पूर्वेला वेगाने तयार होणाऱ्या 20 मजली भिंतीमुळे सूर्य प्रकाश कमी होत चालला होता. कधी नव्हे ते आम्ही उत्तरायण सुरू झाले म्हणजे बाल्कनीत ऊन येईल अशी चर्चा घरात करू लागलो होतो.
आता दक्षिण दिशेलाही हेच.
वाढणारी लोकसंख्या आणि नौकरी, व्यवसायासाठी शहरांमध्ये येण्याची आवश्यकता यामुळे सर्व लहान मोठ्या शहरांमध्ये हेच काँक्रिट जंगलाचे चित्र दिसते.
अनेकदा आकाशाकडे आवर्जून बघितले पण जात नाही.पण आज पोडियम वर निवांतपणे रेंगाळत असल्याने माझी नजर वरच्या आकाशाकडे गेली. उजवीकडच्या फोटोत दिसते ते निरभ्र आकाश पाहून
मला आठवल्या लहानपणीच्या उन्हाळ्यातल्या रात्री. घरात AC नसणारे आणि वारंवार लाईट जाण्याचे ते दिवस . त्यामुळे उकाड्यापासून वाचण्यासाठी आम्ही रोज गच्ची वर झोपायचो.मग आकाशात सप्तर्षी शोधणे ,तारे मोजणे ,पौर्णिमा ते अमावस्या यादरम्यान चंद्राचे बदलणारे आकार आणि त्यावरून तिथी ओळखणे या साऱ्या गोष्टींमधली गंमत विसरूनच गेलो होतो.
निदान आमच्या पोडियम वरून तरी हे आकाश दिसणे कधीच थांबणार नव्हते.
मग अनंत काणेकरांची एक कविता आठवली .त्यात थोडा बदल केला आणि गुणगुणू लागलो.
"अनंत आहे आकाश
आणि अनंत आहेत तारे
पण माझ्या पोडियम वरून दिसणारे आकाश
आणि त्यातले 20-30 तारे , तेवढेच मला प्यारे".
आता रोज रात्री हे तारे बघायचे असे स्वतःला सांगत स्वतःशीच कविता म्हणत मग मी घरात परत आलो.
विवेक कुमठेकर
28 मार्च 25