रुद्रपुजा आणि मी
तीन सप्टेंबरला श्रावण महिना संपला. तसे पाहिले तर महिन्या मागून महिने उलटत जातात आणि बहुतेक वेळा आपल्या ते लक्षात पण येत नाही. भली मोठी वार्षिक टार्गेट असणाऱ्या सेल्स मधल्या लोकांना मात्र डिसेंबर नंतर जानेवारी आला की काही काळ तरी हायसं वाटतं. शाळेतल्या मुलांना मे संपून जून आला की काय वाटतं ते सगळ्यांनी आठवुन बघावं. काही दिवसापूर्वी CA च्या ऑफिस मध्ये गेलो होतो तेव्हा जुलै संपून ऑगस्ट सुरू झाला होता आणि ते सगळे इन्कमटॅक्सचे काम संपल्यामुळे शाळेला सुट्टी लागल्याच्या आनंदात होते. पण मराठी महिन्यांची गोष्टच वेगळी.त्यांची नावे तर बहुतेकांना माहिती नसतात पण श्रावण मात्र याला नक्कीच अपवाद आहे.
श्रावण आला की आपल्याकडील सणांचे आनंदी आणि उत्साही वातावरण सुरू होते.
श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांचे खूपच महत्त्व आहे आणि मग त्यामुळे सगळीकडे रुद्रपूजांचे नियोजन सुरू होते.
दोन तास मंत्र पठण आणि त्या आधी व नंतर एक -दीड तास असे तीन-साडेतीन तास पूजेत बसणे सगळ्यांना लगेच आणि सहज जमते असे बिलकुल नाही. माझाही सुरुवातीचा अनुभव असाच होता.
बऱ्याच वर्षांपूर्वी हैदराबाद येथील श्रीनगर कॉलनीतल्या सत्य साई कलानिगम मध्ये तसे अलिप्तपणेच खुर्चीत बसुन पहिली रुद्रपूजा ऐकल्याचे मला आठवते. कधी संपणार अशी घाई नसली तरी आतुन फार काही वाटत नव्हतं.
पण हळूहळू अशाच नियमितपणे पूजा अटेंड करत गेल्यानंतर आतून काय बदल झाला ते सांगणे अवघड आहे पण झाला हे नक्की .अगदी भौतिकशास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं तर रुद्र पूजेतून येणाऱ्या व्हायब्रेशनशी माझ्या व्हायब्रेशनस मॅच झाल्या.
प्रत्येक माणूस म्हणजे एनर्जी फक्त फ्रिक्वेन्सी कमी जास्त हे किंवा अशा अर्थाचे वाक्य बहुतेकानी Dancing Wu Li masters किंवा Tao of Physics या प्रसिद्ध पुस्तकांमध्ये वाचले असणारच. पण हे लिहिताना माझ्या लक्षात आले की मला माझी सो कॉल्ड फ्रिक्वेन्सी माहितच नाही .पण किती Hz किंवा किती uHz हे आकडे माहीत नसले तरी काही फरक पडत नाही हे पण तितकेच खरे.फ्रिक्वेन्सी मॅच होऊ लागली ते की आपल्याला कळतच आणि ती 100% मॅच झाली की मग रुद्र पूजेतल्या शांतीचा आणि आनंदाचा अनुभव आपोआपच येतो.
त्यात रुद्रपुजेच्या जोडीला असणारा सत्संग म्हणजे दुधात साखरच.
रुद्रपुजेला येणार्या शंभर दीडशे मंडळींमध्ये वेगवेगळे आकार म्हणजे शारीरिक आणि वेगवेगळे भाव म्हणजे मानसिक आकार घेऊन आलेली माणसे दिसतात.कोणी पूजा संपण्याची वाट पाहत असतं तर कोणी पाठ ताठ ठेवून ध्यान लावण्याचा प्रयत्न करत असतात. कोणी भक्तीने भावपुर्ण झालेले तर काही Instagram , Facebook वर टाकण्यासाठी वेगवेगळ्या अँगलने फोटो काढण्यात रमलेले. काही जण भक्ती मार्गावर ठेवलेल्या पहिल्या पावल्यामुळे खुश तर काही अनुभवी मंडळी शिवा बरोबर (म्हणजे भगवान शंकर हो ) गप्पा मारायला आलेली. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट अशी एक कॅटेगरी म्हणजे नंतरच्या प्रसादाची वाट पाहणारी बच्चे कंपनी. या व्यतिरिक्त घरात काय TV बघत बसता माझ्यासोबत पुजेला या जरा पुण्य मिळेल असे सांगुन धरून आणलेली काही प्रौढ (पुरुष) मंडळी पण.
आणि या सगळ्या प्रकार,उपप्रकारातून बाहेर पडुन फक्त पुजे करता आलेल्यांपैकी मी पण आता एक !!!